राजगड-तोरणा-रायगड: मराठा स्वराज्यातील एक ऐतिहासिक वाट – Part 1

आज पर्यंत वर नमूद केलेले तिन्ही किल्ले फक्त इयत्ता चौथीच्या पुस्तकात पाहिलेले. यावर्षी काही हिमालयात मला ट्रेक करता येणार नाही हे ऑगस्टमध्ये समजलेलं होतं. मग विचार केला की सह्याद्रीच्या एखादा कठीण किंवा मोठा ट्रेक करावा. याच दरम्यान शिलेदार ॲडवेंचर्स इंडिया यांची एक जाहीरात नजरेस पडली ज्याचं शीर्षक होतं 'राजगड-तोरणा-रायगड रेंज ट्रेक'.

मग माझ्या मनातली सुप्त आकांक्षा जागृत झाली. आज पर्यंत पुण्यातले राजगड-तोरणा व दुर्गदुर्गेश्वर रायगड कधी अनुभवलेच नाहीत. याच वर्षी राजगड-तोरणा रेंज ट्रेक कामाच्या गडबडीत राहून गेला आणि एकदा खूप लहान होतो तेव्हा रायगडाच्या पायथ्याशी जाऊन माघारी आलेलो ही सल आजवर मनात कुठेतरी दडून होती.

हीच ती वेळ होती ज्यात एका दगडात दोन नव्हे तर तीन-तीन पक्षी मारण्याची नामी संधी चालून आलेली. अर्थातच हा ट्रेक नेहमीच्या ट्रेक्सपेक्षा भरपूर वेगळा व कठीण आहे. स्वराज्य उभारताना मावळे ज्या वाटेने संदेश पोहचवत किंवा हेर त्यांच्या गुप्त बातम्या याच रस्त्याने पोचवत असत, त्यामुळे ही वाटा ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. इतिहास फक्त वाचायचा नसतो, तर तो जगायचा देखील असतो असं कुठेतरी वाचलेलं तेच डोक्यात ठेवून मी हा ट्रेक बुक केला.व्हॉट्सॲप वर ग्रुप मध्ये सामील झालो. ट्रेकिंग ग्रूपने कल्पना दिल्याप्रमाणे हा ट्रेक खूप मोठा व कठीण असणार होता पण मी वर्षभर शारीरिकदृष्ट्या ॲक्टिव असल्यामुळे निश्चिंत होतो. भर उन्हाळ्यात नाळेच्या वाटेने हरिश्चंद्रगड चढलेलो ही बाबही आत्मविश्वास वाढवत होती.

दिवस पहिला:
ठरल्याप्रमाणे ट्रेकचा दिवस (किंबहुना रात्र उजाडली!). गुरुवारी 30 सप्टेंबरला
पुण्यावरून येणारे लोकं स्वारगेट मध्ये जमले. आम्ही रात्री साडेअकराला बसने प्रवास सुरू केला व सुमारे पहाटे १.३० ला पाली गावात पोहोचलो आणि वेळ न दवडता राजगड चढण्यास सुरुवात केली.

रस्ता थोडाबहुत निसरडा होता पण सगळ्यांनी व्यवस्थित पार पाडला. महादरवाजातून आत गेल्यावर पलीकडे दिसणारी चंद्राची कोर फारच विलोभनीय दिसत होती पण ही तर फक्त सुरुवात होती. रात्री तीनला आम्ही पद्मावती मंदिराजवळ पोहोचलो तिथेच दोन-तीन तास सगळे झोपले सकाळी सहाला सगळे उठण्यास सुरूवात झाली.

राजगड ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी भरभराटीला आणलेल्या मराठा स्वराज्याची पहिली राजधानी. हळूहळू सूर्य वर येत होता व आजूबाजूची गर्द हिरवाई खुलून दिसत होती. दोन ठिकाणी खूप सुंदर फोटो काढले एक म्हणजे पद्मावती मंदिरातून दिसणारा पद्मावती तलाव व त्या मागचा डोंगर रांगा आणि दुसरा म्हणजे चोर दरवाजा. मुंबई वरून येणारे साथीदार सकाळीच राजगडावर आले मग सगळ्यांनी स्वतःची ओळख करून दिली त्यानंतर एक ग्रुप फोटो झाला व आम्ही तोरण्याच्या दिशेने मार्गस्थ झालो.

अळू दरवाज्याने उतरून आम्हाला जवळपास ८-१० छोटे मोठे डोंगर/ टेकड्या पार करायच्या होत्या.

पहिल्याच टप्प्यात बरीच घसरण असल्याने मी काही ठिकाणी बसून उतरलो आणि नंतर जाणवलं की खूप मोठी चूक केली. उजव्या पायात अधून-मधून पेटके (cramps) येत होते.

म्हणून मी हळूहळू पुढे जात होतो. ऊनाचा प्रकोप फारसा नसल्यामुळे थोडा दिलासा होताच. मध्ये आम्ही एका पठारावर स्वतःच्या डब्यातला खाऊ खाल्ला. आता तोरणा जवळ भासत होता. शेवटचे दोन तीन डोंगर खुपच उंच व खड्या चढाईचे होते पण ऊन नसल्याने ते जास्त वाटलं नाही. आम्ही जवळपास दुपारी चारला बुधला माचीवर पोचलो. सोबत एक दोन वयस्कर मंडळी होती त्यांनाही सोबत घेऊन चाललो. पहिला दिवस जवळपास संपल्यातच जमा होता असं वाटलं होतं पण आता खरा ट्विस्ट आला.

आम्ही बुधला माचीवरून वळंजाई टाक्या जवळ पोहोचलो तो रस्ता बराच निसरडा होता. तिथून वाटलं की भट्टी गावात पोहोचायला फार फार तर दोन तास लागतील. दुपारी ४.३० ला उतरायला चालू केलं पण मग पाय उत्तर देऊ लागले. ही वाट उतरु शकलो ते फक्त सोबतीला असलेल्या कारवीच्या झाडांमुळे. निसर्ग माणसाच्या मदतीला धावून येतो तो असा. पण उतरताना पायांची दैना झाली. माझा पाय बऱ्यापैकी रुंद असल्यामुळे उतरताना नेहमी त्रास होतो. मध्ये एका ठिकाणी शेवटच्या काही लोकांसाठी थांबलेलो कारण शेवटच्या टप्प्यात रस्ता सापडत नव्हता. ते येईपर्यंत खूप अंधार झालेला. जवळपास ७ ला दुसरा ओढ्याच्या जवळून निघालो. हा टप्पा देखील कठीण होता. वाट अगदीच अरुंद होती व निसरडी सुद्धा. आम्ही कसेबसे रात्री आठला भट्टी गावात पोहोचलो.

लगेचच जेवायला बसलो. जेवण तर खूप चवदार होतं त्यामुळे दिवसभराचा थकवा थोडा वेळ का होईना विसरलो पण जेवण झाल्यावर पुन्हा त्याची आठवण झालीच. उतरताना बुटाच्या पुढच्या भागाला नखं वारंवार आदळून प्रचंड दुखत होती. बहुतेक या शुल्लक कारणापोटी ट्रेक अर्ध्यावर सोडावा लागतो की काय असं वाटायला लागलं होतं. पण दोन किल्ले झाले आणि पुढच्या दिवशी वाट बऱ्यापैकी सोपी होती मग चालत राहू असा विचार मनात आला. अशीच खलबतं मनात चालू होती पण पटकन झोपून घेतलं कारण पुढच्या दिवशी 30 किलोमीटरचा पल्ला गाठायचा होता. उद्याचं उद्या बघू असं म्हणून झोपलो.

दिवस दुसरा:
सकाळी ५.३०चा गजर वाजला आणि डोळा उघडला. ट्रेक कंटिन्यू करण्याबद्दल अजूनही तळ्यात-मळ्यात होत होतं. थोडसं बरं वाटत होतं त्यामुळे कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला.

पायाच्या चार बोटांना बँडेज लावून ट्रेक पूर्ण करेन पण इथून पुन्हा मागे गेलो तर जिवाला लागलेली हुरहूर कदाचित जास्त वेदनादायी असेल हे माहीत होतं. माझ्या भाषेत बोलायचं झालं तर ' माझ्या आत्म्याला शांती मिळाली नसती!'. त्या दिवशी मागे राहायचे नाही हे ठरवलं होतं त्यामुळे जे लोकं पुढे चालत आहे त्यांच्या सोबत चालत राहायचं एवढंच डोळ्यासमोर लक्ष्य ठेवलं होतं. सकाळी चहा नाश्ता करून सगळे तयार झाले. ट्रेक लीडर दादांनी खूप छान माहिती दिली.

भट्टी गावात एक प्राचीन मंदिर होतं तिथे तोरणा किल्ल्यावर वास्तव्यास असताना खुद्द छत्रपती कोणत्याही मोहिमेला जाण्याआधी दर्शनाला यायचे. त्या मंदिराची कमान बघूनच खूप जुनी वाटत होती पण दादाने सांगितल्यावर समजले कि ती सुमारे हजार वर्ष जुनी आहे. हीच कमान नंतर मूळ मंदिरातून काढून भट्टी गावातील राम मंदिराला बसवण्यात आली. याच राम मंदिरात आम्ही रात्रीचा मुक्काम केला होता.

दुसरा दिवस फार मोठा होता. आम्ही आधी मोहरी गावात जाणार होतो. भट्टी ते मोहरी हे अंतर 15 किलोमीटर आहे. वाटेत गेळगणी हे गावही लागलं.
मोहरीतून सिंगापूर नाळेवाटे खाली उतरून संध्याकाळी दापोली मार्गे वारंगी गावात पोचायचे होते. एवढा मोठा प्रवास पायी करायचा म्हणजे शरीरापेक्षा मनाची तयारी जास्त लागते. सकाळी ७.३०ला प्रवास सुरू केला. गावातच असलेला ओढा पार केल्यानंतर सुमारे अर्धा-पाऊण तास अतिशय घनदाट जंगलातून वाट काढत गेलो. सगळीकडे चिखल आणि काटेकुटे होते. ते चुकवत मिळेल तिथे फांद्या पकडून कूच करत होतो. ट्रेक लिडर दादा व इतर शिलेदार चाकूने फांद्या कापत सर्वांना वाट करून देत होते. ह्याची मज्जाही काही औरच आहे आणि ती सगळ्यांना समजत नाही. काट्याकुट्यांच्या जंगलाने नंतर स्वतःचा पसारा कमी केला आणि आम्ही एका मोकळ्या जागी पोहोचलो. तिथून गेळगणी पर्यंत साधारण दोन ते चार किलोमीटर ची वाट सोपी होती. एका बाजूला गुंजवणे धरण दिसत होते आणि गेळगणीला जाऊन मागचे लोक येईपर्यंत आम्ही विश्रांती घेतली. सर्वांनी गावातल्या मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ अशा वस्तूही दिल्या. एव्हाना सकाळचा नाश्ता जिरला होता. त्यामुळे आम्ही पण बॅगमधला खाऊ खाऊन मोकळे झालो. तिथेच विहिरीवर पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. अंदाजे १०.३० ला पुन्हा चालायला लागलो.

गेळगणी पासून मोहरी पर्यंतचा रस्ता देखील बऱ्यापैकी सोपा होता. आम्ही कारवीच्या बहरलेल्या ताटव्यामधून चालत होतो. गुलाबी, जांभळा अशा रंगात ती झाडे न्हाऊन निघालेली होती. कारवीची ही फुललेली झाडं सात वर्षात फक्त एकदाच पाहायला मिळतात त्यामुळे योग्य वेळी, योग्य ठिकाणी असल्याचा आनंद होता. खूप भारी वाटतं होतं त्या झाडांमधून चालताना.

मध्येच एखादे मोकळे पठार लागत होते. ज्यावरून दूरपर्यंत नजर टाकली तर फक्त गर्द हिरवाई दिसत होती.
मध्ये एक पाण्याचे टाकेदेखील लागले तिथे क्षणभर थांबलो. मोहरीला पोहोचण्यासाठी शेवटचा टप्पा चालू झाला तेव्हा सूर्य डोक्यावर आलेला. डाव्याबाजूला दुरवर राजगड व तोरणा स्पष्ट दिसत होते. थोड्यावेळाने सिंगापूर गावाचे दर्शन झाले इतक्यात समोर शिवलिंगासमान भासणारा भव्य लिंगाणा व त्याच्याच मागे दर्शन झाले ते रायगडाचे. रायगड इतक्या जवळ दिसल्यामुळे हुरूप वाढला खरा पण अजून किती लांब होता हे नक्की माहीत नव्हते. पाय तर प्रचंड दुखत होते पण 'मंजिल अब दूर नही' हा दिलासाही होता.

दुपारी एक वाजता मोहरी गावात पोहोचलो व तिथे लगेच जेवायला बसलो. मोहरी हे बरंच दुर्गम गाव आहे. तिथे किराणामाल न्यायचा म्हटलं तरी वेल्हे या गावामधून न्यावा लागतो. अशा परिस्थितीत देखील एका कुटुंबाने जेवणाची सोय करून दिली होती. जेवायला अतिशय अप्रतिम अशी नाचणीची भाकरी व चण्याची भाजी होती. जेवण तर एकदम चविष्ट झालेले. ताट-वाट्या, ग्लास असा लवाजमा नव्हता तर भाकरीवरच भाजी वाढण्यात आली. खूप छान अनुभव होता. आता वर ढगांची चादर पसरू लागली होती. सगळेजण आराम करत होते. नाळेतून उतरताना पाऊस नकोय एवढीच इच्छा होती आणि वरुणराजाने ती ऐकलीदेखील. दुपारी २ वाजता आम्ही पुढची वाट धरली. ही आता उतरंडीची वाढ झरझर समुद्रसपाटीपासूनची उंची कापत खाली येत होती. पुन्हा पाय उत्तर द्यायला लागले आणि मी मागे पडलो. ऊनही थोडे वाढले होते. एक दोन ठिकाणी अवघड उतरण होती त्यातल्या एका पॅचला सूर्य तळपत होता त्यामुळे दमायला झाले. दर १५ मिनिटाला पाणी व Enerzal चा कार्यक्रम चालूच होता. दुपारी तीन ला पुन्हा एक ओढा लागला. तिथे पाण्यात पाय मोकळे सोडून बसलो व खूप हायसे वाटले. पंधरा मिनिटं बसलो आणि पुन्हा पुढे निघालो. सिंगापूर नाळ सुरू झाली. ही नाळ तशी बरीच सोपी आहे. आग्याची नाळ व बोराट्याची नाळ खूप कठीण आहे असं ट्रेक लिडर प्रदिपदादा बोलला. जवळपास शंभर फूट उतरल्यावर पुन्हा जंगलातली पायवाट लागली. वाटेत एका ठिकाणी दोर लावावा लागला. त्यासाठी थांबलो असताना अविनाश नावाच्या एका ट्रेकरने उस्फुर्त अशी गारद दिली. त्याचा आवाज जवळच्या कडेकपाऱ्यातूंन तीन वेळा घुमला. सर्व जण दिवसभर चालून थकले होते अशावेळी महाराजांच्या नावाचा जयघोष करून सर्वांच्या अंगात पुन्हा नवीन वारं संचारलं. महाराजांच्या नावाची किमयाच म्हणा हवं तर याला! दोर पकडून उतरल्यावर मग जोमाने उतरायचा प्रयत्न करत होतो पण पाय काही साथ देत नव्हते. संध्याकाळी सहाच्या सुमारास एका पठारावर आलो आणि मागेच उत्तम असा लिंगाणा पुन्हा दिसला. माझ्यात काही फोटो काढण्याचे विशेष त्राण उरले नव्हते. लवकरात लवकर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचं आणि मिळालं तर अंघोळ करायची एवढंच डोक्यात होतं. पण त्या पठारावरून आजूबाजूच्या डोंगररांगा खूपच सुंदर दिसत होत्या. माझ्यामधल्या फोटोग्राफरला देखील अशावेळी राहवत नाही आणि एक दोन फोटो टिपलेच. सिंगापुर नाळ उतरताना आम्हाला दोन धबधबे देखील दिसले जे सहसा बाहेरचं दुनियाच्या नजरेस पडत नसावेत. पुन्हा संध्याकाळी ६.३० ला एक ओढा लागला. तो पार करायला थोडा अवघड होता. तिथे पुन्हा आम्ही विश्रांती घेतली. मग अंधार झाल्यावर पुन्हा चालायला लागलो. दापोली गावात पोहोचायला अजून थोडा वेळ होता. आता वाट तशी सोपी होती. माझी चार्जिंग वर चालणारी बॅटरी तुटली त्याचा फार त्रास झाला नाही. जवळपास रात्री ८ ला आम्ही दापोली गावात पोहोचलो. तिथे असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून सगळे पुढे निघालो. असं वाटलं की वारंगीजवळ आलोय पण वारंगी अजून बराच पुढे होतं. मध्ये एक नदी वरचा पुल ओलांडून गेलो जो जेमतेम अवस्थेत होता. एकावेळी फार फार तर २-३ जण त्यावरून जात होते. पुढे पक्का रस्ता लागला. तिथे आमच्यासाठी एक गाडी उभी होती. त्यात बरेच जण चढले. काहींनी आपल्या बॅग्स त्या गाडीत ठेवल्या व चालत राहिले. मला मात्र बॅग घेऊनच पूर्ण ट्रेक करायचा होता म्हणून मी तसाच चालत राहिलो. मग एक ट्रेक लीडर आणि आम्ही ४ जण चालत राहिलो. आमच्यापुढे फक्त घनदाट काळोख आणि वर चांदणं होतं. एखादं दुसरं घर पुढे दिसत होतं पण गाव काय दिसतं नव्हतं. ती गाडी पुन्हा माघारी आली. रात्रीचे ९ वाजलेले. मग दुसरा पर्याय नाही म्हणून आम्हालाही गाडीतून २-४ किमीचा प्रवास करावा लागला. तब्बल १४ तास ट्रेक करून रात्री ९.३० ला वारंगी मध्ये पोहोचलो. लगेच जेवून घेतलं आणि मग झोपी गेलो. आमची जेवायची आणि राहायची खूप छान व्यवस्था केली होती.

पुढल्या दिवशी साक्षात रायगडाचे दर्शन घ्यायचे असल्याने मनात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. दिवसभर एवढं चालून दमल्यामुळे झोप कधी लागली ते कळलंच नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *