रायगड माहीत नसलेला मनुष्य महाराष्ट्राच्या मातीत सापडणं कठीणच आहे तसं. वारंगीमधून अवाढव्य दिसणारा रायगड आपला राजेशाही थाट दाखवत होता. आता केवळ काही तास ट्रेक करायचा आहे हा खूप मोठा दिलासा होता. कितीही सवय असली तरी असे मोठे रेंज ट्रेक्स आपली ऊर्जा शोषून घेतात. वारंगीमध्ये असलेल्या मंदिरात जे शिवलिंग आहे, ते रायगडावरील जगदीश्वर मंदिरातील मूळ शिवलिंग आहे. १६८९ मध्ये जेव्हा रायगडाला मुघलांनी वेढा दिलेला, तेव्हा हे शिवलिंग वाघ दरवाजामार्गे वारंगीतल्या मंदिरात आणण्यात आले होते. सकाळी नाश्ता केल्यावर मी ह्याच मंदिरात जाऊन ते शिवलिंग पाहून आलो. आम्ही ७.३० ल ट्रेक सुरु केला. सुरुवातीला २-३ कीमी काळ नदीच्या खोऱ्यातून चाललो. अंधुक धुकं होतं पण आजूबाजूचे डोंगर एकदम स्पष्ट दिसत होते. थोडी फोटोग्राफी केली. गावाच्या थोडं पुढे जाऊन काळ नदी वरचा पूल लागला तो पार करून रायगडवाडीच्या वाटेला लागलो. आजच्या दिवशी चढ एवढा नव्हता. मजल दरमजल करत आम्ही रायगड वाडी चढून वर रायगड खिंडीत पोहोचलो. तिथे मागचे सगळे येईपर्यंत विश्रांती घेतली. सगळ्यांनी आपआपल्या आवडीनुसार वडापाव, कोकम सरबत, ताक यावर यथेच्छ ताव मारला. मी तर कोकम सरबतच प्यायलो कारण ऊन भरपूर होतं. थोड्या वेळानंतर इथेच एक ग्रुप फोटो काढून सगळे नाणे दरवाज्याकडे चालायला लागले. वाटेत गप्पाटप्पा चालू होत्या.
खऱ्या अर्थानं ट्रेकचा शेवटचा टप्पा सुरु झाला. नाणे दरवाज्याचे मूळ नाव नाना दरवाजा असे होते पण पेशव्यांच्या काळात याचा नाणे दरवाजा असा अपभ्रंश झाला असावा असे मानले जाते. ह्याच दरवाज्याचा 'लहाना दरवाजा' असा उल्लेख इंग्रज प्रवासी टॉमस निकोल्स याच्या प्रवासवर्णनात आढळतो. हा रस्ता पायऱ्यांचा होता पण डोंगररांगेतील भटकंतीपेक्षा पायऱ्यांवर जास्त दमछाक होते हे सर्वमान्य आहे.
नाणे दरवाजाचे प्रवेशद्वार हे गोमुखी रचनेचे आहे. वर अजून चढून गेलो की काही वेळाने महादरवाजा येतो. महादरवाज्याची बांधणीदेखील वैशिष्टयपूर्ण आहे. रायगडाचे वर्णन करायला वेगळा एक ब्लॉग लिहावा लागेल इतकं विचारपूर्वक बांधकाम आहे. अर्थात, राजधानीसाठी महाराजांनी रायगडाची निवड का केली हेदेखील जाणण्यासारखे आहे. सध्या वाचन सूरू आहे त्यातूनच ही सगळी माहिती लिहीत आहे. उन्हामुळे त्या दिवशी पुरती दमछाक झाली. मागच्या दोन दिवसात केलेली पायपीट आणि त्यामुळे आलेला ताण हा नक्कीच जाणवत होता पण एवढं चाललो आणि आता अजुन थोडंसं चालायचं आहे हाच काय तो दिलासा होता. पुढे आम्ही अजून वर चालत गेल्यावर हत्ती तलाव आणि नंतर गंगासागर तलाव लागला. गंगासागर तलावाचे ४थी च्या पुस्तकातले चित्र जणू डोळ्यासमोर उभे राहिले. थोड्या वेळात पालखी दरवाज्याने वर गेलो आणि मुख्य पठारावर पोहोचलो. तिथे असलेल्या सर्व वास्तू पाहत होतो. आजुबाजुला गाईड्स गडाची माहिती सांगत होते. तिथे महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मग नगारखाना पाहून पुढे गेलो. होळीचा माळ देखील पाहिला आणि तेव्हाच्या काळी सण कसे साजरे होत असतील याची कल्पना केली. बाजारपेठेमार्गे आम्ही जगदीश्वर मंदीराची वाट धरली. ही बाजारपेठ म्हणजे शिवरायांच्या दूरदृष्टीची आणखी एक जिवंत निशाणी आहे. इथे हुजुरबाजार उभा करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्याबद्दल आप्पा परब यांचे पुस्तक नक्की वाचा. जगदीश्वर मंदिरात खूप छान दर्शन झाले. साक्षात महाराज इथे पूजाअर्चा करायला यायचे ही कल्पनाच खूप भन्नाट आणि प्रेरणा देऊन जाणारी होती.
नंतर महाराजांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन आम्ही परतीची वाट पकडली.
रायगडाचे दर्शन घेऊन झाले आणि हा ट्रेक सार्थकी झाला याचे समाधान वाटले. आम्ही एवढी सगळी ट्रेकिंगची साधनं असून दमलो. त्याकाळी हेर अवघ्या काही तासांत रात्रीच्या वेळी ह्या अवघड घाटवाटा कशा पार करत असतील याची फक्त कल्पना केलेलीच बरी.
त्यानंतर आम्ही महादरवाज्याच्या वाटेने हिरकणी वाडीत उतरलो. छान जेवण झाले. मुंबईला जाणारे दुपारी ३.३० ला निघाले. आम्हीही ५.३० ला पुण्याची वाट धरली. वाटेत पाचडला असणारी जिजाऊंची समाधी पाहिली. वेळेअभावी तिथे थांबता आले नाही. पण आता रायगडावर पुनःपुन्हा यायला मिळावे हीच इच्छा आहे. एका दिवसात काय, एक आठवडा थांबलो तरी नीट पाहून होणार नाही. तो इतिहास जगायला काही दिवस पुरेसे नक्कीच नाहीत.
हा ट्रेक आतापर्यंत मी केलेल्या ट्रेक्सपैकी सर्वात मोठा ट्रेक होता. ३ दिवसात आम्ही ७५ किलोमीटर एवढे अंतर कापले. दमछाक खूप झाली पण अतिशय भन्नाट आणि स्फूर्ती देणारा असा अनुभव होता. ट्रेकमध्ये येणाऱ्या अडचणी वारंवार नमूद करण्याचा हेतू हाच आहे की, सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये ट्रेक करताना कधीही कोणत्याही गोष्टीला तोंड द्यावे लागते. एकदा बेस सोडला की सगळं रामभरोसे. तुमच्या हातात (किंबहुना, पायात!) फक्त सावकाश तोल सांभाळत चालत राहणे हेच एक काम आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. खराब वातावरण, पडून किरकोळ लागणे, शु-बाईट्स......
पण मागे फिरायचे की नाही हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपली शारीरिक क्षमता जाणून मगच असे मोठे ट्रेक्स करावेत. कारण आजकाल ऐकायला फार cool वाटतं, insta वर आपले फोटोज् व्हायरल व्हावेत म्हणून ट्रेक करणारे भरपुर झालेत. त्यांच्यातला एक नका बनू. आपला दैदिप्यमान इतिहास आणि या घाटवाटा हा एक अनमोल ठेवा आहे जो आपल्यालाच पुढे न्यायचा आहे. त्याबद्दल जाणून घ्या. सह्याद्रीवर केलेलं प्रेम वाया तर नक्कीच नाही जाणार. उलट ते प्रेम कितीतरी पटीने तुम्हाला साभार परत मिळेल. फक्त तिच्यासमोर नतमस्तक होता आलं पाहिजे. कारण अतीव अहंकार मनात असेल तर तोही उतरवायला हे डोंगर मागेपुढे पाहत नाहीत 🙂 जमलं तर महाराजांची आणि शूरवीर मावळ्यांची सेवा म्हणून ह्या अनमोल वारशाबद्दल लोकांना आपआपल्या परीने educate करा. एवढंच बोलून ह्या ब्लॉगची सांगता करतो. जय शिवराय!!